गोंदिया - जिल्ह्यातील धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पात लाखोंच्या संख्येत मासे मृत्युमुखी पडले असल्याची घटना समोर आली आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून यामध्ये स्थानिक मासेमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता या मच्छिमारांचा उदरनिर्वाह संकटात आले आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्याअंतर्गत धापेवाडा धरणात परिसरात मासेमारी केली जाते. आज सकाळी मच्छिमार याठिकाणी मासेमारी करायला गेले असता त्यांना पाण्यात मासे तरंगत असताना दिसून आले. धरणाच्या खालच्या बाजूला पाणी कमी झाल्याने हे मासे एकाच जागी मोठ्या संख्येने एकत्रित झाले. त्यामुळे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे तसेच उष्णतेमुळे या माशांचा मृत्यू झाला असल्याचे बोलले जात आहे.
२ दिवसापूर्वी उपसासिंचन प्रशासनाद्वारे धरणाची दारे बंद करण्यात आली होती. त्यामुळे धरणाबाहेर गेलेल्या माशांना पुन्हा परत येता आले नाही. त्यामुळे खोलगट भागात पाण्याच्या कमतरतेमुळे माशांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक मासेमारांकडून सांगण्यात येत आहे.
तर हजारोंच्या संख्येने मासे मृत्युमुखी पडल्यामुळे मच्छिमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मासेमारी करणाऱ्या लोकांवर उदरनिर्वाह कसा करायचा? याचे संकट निर्माण झाले आहे. मात्र, याला जबाबदार कोण ? असा प्रश्नही निर्माण होत आहे.