गोंदिया - मोठा घातपात घडवण्या नक्षलवाद्यांचा प्रयत्न जिल्हा पोलीस दलाने हाणून पाडला आहे. 10 जानेवारीला पोलिसांनी केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या दुर्गम भरणोलीच्या जंगलातून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केले.
मिळाली होती गुप्त माहिती -
अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना भरणोली जंगल परिसरात पुढील ग्रामपंचायत व जिल्हा परिषद निवडणुकीच्या दरम्यान घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने विस्फोटक साहित्य लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या नेतृत्वात नवेगावबांध येथील सी-60 कमांडो टीम, सशस्त्र दूरक्षेत्र भरणोली येथील अधिकारी-कर्मचारी, बीडीडीएस टीमने भरणोली जंगल परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले.
स्फोटके केली जप्त -
पोलिसांना बोरटोळा ते धानोरीच्या उत्तर पर्वतीय भागात दगडाजवळ काही संशयास्पद वस्तू आढळल्या. त्याची श्वान पथक व बीडीडीएस टीमच्या मदतीने तपासणी करण्यात आली. त्यात स्फोटके असल्याचे निष्पन्न झाले. या स्फोटकांना बीडीडीएस टीमच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. यामध्ये जर्मन डबा (10 किलो क्षमता), लोखंडी खिळे, काच, वायर, काळे विस्फोटक पवडर आढळली. हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल करत आहेत.