गोंदीया - मनरेगाच्या कामावरून दुपारी जेवणाच्या सुटीत घरी गेलेल्या तिरोडा तालुक्यातील बरबसपुरा येथील महिलेचा मृत्यू झाला आहे. छन्नुबाई छोटेलाल पारधी (वय ५५ वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे.
सकाळी छन्नुबाई बरबसपुरा येथे सुरू असलेल्या मनरेगाच्या कामावर गेली होती. त्यानंतर ती दुपारच्या सुटीत घरी आली होती. याच दरम्यान तिचा मृत्यु झाला. तिचा नेमका मृत्यु कशामुळे झाला हे मात्र कळु शकले नाही. छन्नुबाईच्या पश्चात पती, दोन मुली व एक मुलगा असा परिवार असून दोन्ही मुलींचा विवाह झाला आहे. तर मुलगा नागपूर येथे मजुरीचे काम करतो. पती छोटेलाल हे अपंग आहे. छन्नुबाई हीच त्यांच्या पतीचा आधार होती.
मागील तीन-चार दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. अशा उन्हाच्या झळा सोसत मनरेगाच्यावरील मजुरांना कामे करावी लागत आहे. त्यामुळे उष्माघाताचे सुध्दा प्रमाण वाढले आहे. शासनाने मनरेगाच्या कामावरील मजुरांना कामाच्या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहे. मात्र, त्याचे पालन केले जात नसल्याची माहिती समोर येत आहे. बरबसपुरा येथील सरपंच नरेश असाटी यांना याबाबत विचारणा केली असता गावात ज्या ठिकाणी मनरेगाचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी मजुरांसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळे मजुरांना स्वत:च पाणी आणून तहान भागवावी लागत आहे. तर काम सुरू असलेल्या ठिकाणी मंडप सुध्दा टाकण्यात आलेला नाही. त्याचाही फटका मजुरांना बसत असल्याचे सांगितले. मात्र, याकडे संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसत आहे.