गोंदिया - पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी आज (ता. २७ फेब्रुवारी) भाजप महिला मोर्चाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. गोंदियातही भाजप महिला मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी गोंदिया येथील जयस्तंभ चौकात खासदार कार्यालयाजवळ भाजप महिला मोर्चाने वन मंत्री संजय राठोड यांचे पोस्टर जाळत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. याबाबतचे निवेदन गोंदिया शहर पोलिसांना दिले आहे.
बीडच्या पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली. या प्रकरणात शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव विरोधकांकडून घेतले जात आहे. ही घटना समोर आल्यानंतर सुरुवातीच्या काळात मंत्री संजय राठोड काही दिवस नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर ते सर्वांसमोर आले. परंतु, त्यांनी या प्रकरणात त्यांच्यावर होत असलेले आरोप फेटाळत माझी व माझ्या कुटुंबीयांची बदनामी करू नये, असे पत्रकार परिषदेत म्हटले होते. मात्र, राज्य शासनाने देखील या प्रकरणाच्या चौकशीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची पावले उचलली नाहीत. तसेच, मंत्री राठोड यांचा राजीनामा घेतलेला नाही. त्यामुळे विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. मंत्री राठोड यांचा राजीनामा घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. पूजाला व तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, या मागण्यांसाठी भाजपच्या वतीने आज राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. याच आंदोलनावेळी गोंदियात भाजप महिला मोर्चाने मंत्री संजय राठोड यांचे पोस्टर जाळले.
जयस्तंभ चौकात जाळले मंत्री राठोड यांचे पोस्टर
गोंदिया जिल्हा महिला भाजपच्या वतीने आज गोंदियातील जयस्तंभ चौकातील खासदार कार्यालयाजवळ भाजप महिला मोर्चाच्या महिलांनी एकत्र येत शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचे पोस्टर जाळले. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा व पूजा चव्हाण व तिच्या कुटंबीयांना न्याय मिळावा, याचे निवेदन गोंदिया शहर पोलिसांना दिले.
सरकार अत्याचारी असल्याचा भाजपचा आरोप
जेव्हापासून हे 'तीन तिघाडी आणि काम बिघाडी' सरकार आले आहे, तेव्हापासून महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. जे शासनात बसले आहेत, तेच महिलांवर अत्याचार करत आहेत. याआधीही राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने अत्याचार केल्याचा आरोप केला होता. त्यावेळी देखील सरकारने हे आरोप दडपण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता संजय राठोड हेही अशाच एका घटनेत दोषी असल्याचे दिसून येत आहे. राज्याचे मंत्रीच असे अत्याचारी असतील तर, महिला आणि मुलींना सुरक्षा कशी वाटेल, असा प्रश्न भाजप महिला मोर्चातर्फे उपस्थित केला. राज्यातील सरकार अत्याचारी आहे. त्यामुळे या सरकारला सत्तेत राहण्याचा काहीच अधिकार राहिलेला नाही. अशा दोषी मंत्र्यांवर कारवाई करण्यात येत नसेल तर, महाविकास आघाडीने सरकार सोडावे, अशी मागणी भाजप महिला मोर्चाने केली.