गोंदिया - नवजात बालकांची अदला-बदली होण्याचे प्रकार अनेकदा घडत असतात. याला आळा घालण्यासाठी जन्माला आल्यानंतर काही तासांतच बाळाची आधार नोंदणी होणार आहे. राज्यातील जिल्हा, उपजिल्हा, स्त्री आणि ग्रामीण रुग्णालय या आरोग्य संस्थांमध्ये ही सुविधा एकाच वेळी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. १ जानेवारी २०२० पासून याची अंमलबजावणी होणार आहे.
आरोग्य विभागाने हा उपक्रम पहिल्यांदाच हाती घेतला आहे. आधार नोंदणीसाठी हाताचे ठसे, डोळ्याच्या बुबुळांची प्रतिमा आणि ओळखपत्र अशी कागदपत्रे लागतात. मात्र, आता बाळ जन्माला आल्यानंतर त्याला रुग्णालयातच आधार कार्ड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी आरोग्य विभाग आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण(युआयडी) विभागाच्यावतीने चार दिवसांचे प्रशिक्षण दिले जात आहे.
हेही वाचा - ८ वर्षीय चिमुकलीचे धाडस; स्त्री भ्रूण हत्येविरोधात सायकलवरून जनजागृती, १२० किमीचा प्रवास
राज्यातील ३४ वैद्यकिय अधिकाऱ्यांसह दोन कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. प्रशिक्षित कर्मचारी आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य संस्थेत नियुक्त केलेल्या एक परिचारिका आणि लिपीक वर्गीय कर्मचाऱ्याला माहिती देणार आहेत. यासाठी संबंधित जिल्ह्याच्या प्राधिकरण कार्यालयाचीही मदत घेतली जाणार आहे. आरोग्य विभागाने बालकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्याने आधार कार्ड बनवण्याचा त्रास होणार नाही.
संबंधित बाळाचे आधार कार्ड देताना त्याच्यासोबत आई, वडील किंवा पालक म्हणून कर्तव्य बजावत असलेल्या व्यक्तीचे ओळखपत्र आवश्यक आहे. बाळाचे फोटोव्दारे आधार संलग्न केले जाणार आहे. रुग्णालयातून सुटी होण्यापूर्वीच पालकांच्या हाती हे आधार कार्ड दिले जाणार आहे.