गोंदिया- जिल्ह्यातील २५ तरुण दुबई येथे कामासाठी गेले होते. मात्र, ते दुबईत ज्या कामासाठी गेले ते काम त्यांना न देता त्यांना मजुरीचे काम दिले गेले. त्यामुळे त्या कामाला तरुणांनी विरोध केला. त्यामुळे त्या मुलांचे जेवण कंपणीने देणे बंद केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर मुलांनी याबाबत विडिओ तयार केला. तो विडिओ वायरल झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
हेही वाचा-गोंदियात बनावटी दारूच्या कारखान्यावर गुन्हे शाखेचा छापा; साडे सहा लाखांचा माल जप्त
गोंदियातील ते तरुण आर.जी. इन्सोलेन्स ट्रेनींग सेंटर चालविणारा एजेंट राज सोनवणे यांच्या माध्यमातून ४ सप्टेंबरला नोकरीसाठी दुबईत गेले होते. दुबईत ज्या कामा निमित्त त्यांना नेले गेले ते काम त्यांना न देता दुसरेच काम दिल्याने मुलांनी याचा विरोध केला. विदेशात नेवून फसवणूक केल्याने मुलांनी राज यांच्या विरुद्ध एक व्हिडिओ तयार करुन सोशल मीडियावर वायरल केला. त्यात भारतात परत आणण्याची त्यांनी विनंतीही केली आहे. या तरुण मुलांकडून दुबई येथे काम करण्यासाठी दोन वर्षाचा करार मुबईतील सीगल इंटर नॅशनल कंपनीच्या माध्यमातून करण्यात आला व या कंपनीद्वारे या २५ तरुण मुलांना दुबई येथे नेण्यात आले.
काय आहे प्रकरण-
तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील २५ तरुण कामाच्या शोधात भटकत होते. त्यांनी कामासाठी तिरोडा येथील आर जी इनसोलेन्स ट्रेनींग सेंटरच्या राज सोनवाने यांची भेट घेतली. आॅगस्ट महिन्यात मुंबई येथील सीगल इंटरनॅशनल कंपनी मार्फत त्यांची तिरोडा शहरात मुलाखत घेण्यात आली. त्यात २५ ही तरुण प्ररदेशात जाण्यासाठी निवडले गेले. त्यानंतर तरुणांकडून प्रत्येकी ४५ हजार रुपये घेण्यात आले. मुंबई येथून ३ सप्टेंबरला दुबईसाठी त्यांना रवाना करण्यात आले. ४ सप्टेंबरला दुबईतील इंटमास कंपनीत ते पोहचले. ५ सप्टेंबर पासून कंपनीने या २५ तरुणांना कामावर घेतले. मात्र करारात जे काम लिहले होते ते न देता त्यांना मजुरीचे काम दिले गेले. मुलांनी या कामाचा पहिल्याच दिवशी विरोध केला. आम्हाला भारतात परत पाठवण्याची मागणी त्यांनी कंपनीकडे केली. मात्र, कंपनीने मुलांना लवकरच तुमचे काम तुम्हाला देऊ असे सांगितले. मात्र आपली फसवणुक झाल्याचे समजताच त्या तरुणांनी व्हिडिओ तयार केला.
दरम्यान, या संदभार्त स्थानिक आमदार विजय राहगडाले यांनी विदेश मंत्रालय आणि संबंधित कंपनीशी संपर्क साधला आहे. येत्या १० दिवसात त्या २५ मुलांना भारतात परत आणू असे आश्वासन दिले आहे. तर संबंधित राज सोनवाणे यांनी देखील २५ मुले परदेशात अडकली असल्याने दुबई सरकारच्या नियमाप्रने कार्यवाही करुन १० दिवसात परत येतील अशी माहिती दिली आहे.