गडचिरोली - सहा पोलिसांच्या हत्येसह 18 खून, 10 जाळपोळीच्या घटनांमध्ये सहभागी असलेला टीपागड दलमचा जहाल नक्षलवादी यशवंत बोगा (35) याच्यासह त्याची पत्नी शारदा नैताम (32) हिला गडचिरोली पोलिसांनी सोमवारी अटक केली. या दोघांवरही 130 हून अधिक गुन्हे असल्याने शासनाने त्यांच्यावर 18 लाखांचे बक्षीस ठेवले होते, तर नऊ लाखांचे बक्षीस असलेला एक पुरुष व एका महिला नक्षलवाद्यांनी सोमवारी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.
अटक करण्यात आलेला यशवंत बोगा हा टिपागड दलमचा कमांडर होता. तो 2009 मध्ये टिपागड दलममध्ये सहभाग झाला. त्याच्यावर गडचिरोली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात 78 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यामध्ये हत्तीगोटा, मरकेगाव यासह 1 मे 2019 रोजी दादापूर येथे वाहन जाळपोळ तसेच जांभूळखेडा भूसुरुंग स्फोटात त्याचा मुख्य सहभाग होता. त्याच्यावर शासनाने 16 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, तर त्याची पत्नी शारदा हिच्यावर गडचिरोली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात 47 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तिच्यावर शासनाने दोन लाखाचे बक्षीस ठेवले होते. या दोघांनाही गडचिरोली पोलीस दलाच्या नक्षलविरोधी अभियान पथकाने महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील वडगाव-समदपूर जंगलामध्ये अटक केली.
जतीन उर्फ भाऊजी तुमरेटी (24) व रंजना उर्फ ज्योती दोगे मटामी (18) या दोघांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. जतिन हा 2016 मध्ये चातगाव दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाला. 2019 पर्यंत तो कमांडर सुकलालचा बॉडीगार्ड म्हणून कार्यरत होता. त्यानंतर 2020 मध्ये तो चातगाव दलममध्ये परतला. त्याच्यावर दहा चकमकीचे, दोन खुनाचे गुन्हे दाखल असल्याने शासनाने 4 लाख 50 हजार रुपये बक्षीस त्याच्यावर ठेवले होते, तर रंजना ही 2018 मध्ये गटा दलममध्ये सहभागी झाली. तिच्यावर चकमकीचे चार गुन्हे दाखल असल्याने शासनाने 4 लाख 50 हजार रुपये बक्षीस ठेवले होते. या दोघांनी नक्षली चळवळीला कंटाळून सोमवारी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. दोघांचेही गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक महादेव तांबडे यांनी दुपट्टा देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक (अभियान) अजय बंसल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक (प्रशासन) मोहितकुमार गर्ग, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया आदी उपस्थित होते.