गडचिरोली - जिल्ह्यात मानव विकास कार्यक्रमांतर्गत सिरोंचा, एटापल्ली तालुक्यातील आदिवासी महिला बचत गटांना ट्रॅक्टरचे वितरण केले. माजी राज्यमंत्री आणि विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा हस्ते ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. यावेळी धर्मरावबाबा आत्राम यांनी फित कापून लाभार्थ्यांकडे गाड्यांच्या चाव्या सुपूर्त केल्या.
याप्रसंगी आत्राम म्हणाले, की आपला देश कृषी प्रधान असून शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळे आधुनिक पद्धतीने शेती करणे अत्यावश्यक झाले आहे. तसेच महिला सक्षमीकरण करणेही काळाची गरज आहे, त्याच उद्देशाने 90 टक्के अनुदानावर महिला गटांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात येत आहे. आता या भागातील शेतीसुद्धा आधुनिक पद्धतीने केली जाईल, असे आत्राम म्हणाले.
अनेक वर्षांपासून सिरोंचा तालुक्यात मका खरेदी केंद्र नसल्याने शेतकर्यांना अडचणी येत होत्या, हे लक्षात घेऊन शासनाने सिरोंचा तालुक्यातील शेतकर्यांसाठी मका खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी जि. प. अध्यक्षा भाग्यश्री आत्राम (हलगेकर), राष्ट्रवादीच्या जिल्हा महिला कार्यकारी अध्यक्ष शाहीन हकीम, ज्येष्ठ कार्यकर्ते बबलु हकीम उपस्थित होते.