गडचिरोली - जिल्हा परिषदेच्या युनियन बँकेच्या खात्यातून बनावट धनादेशाच्या आधारे तब्बल २ कोटी ८६ लाख रुपये लंपास केल्याचे प्रकरण समोर आले होते. याप्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे. हे आरोपी मध्यप्रदेश, भंडारा व नागपूर जिल्ह्यातील आहेत. न्यायालयाने गुरुवारी सहाही आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
स्नेहदीप श्रीराम सोनी (४७) रा. नंदनवन, केडीके कॉलेजजवळ नागपूर, किशोरीलाल हिरालाल डहरवाल(५१) रा.रेड्डी,ता.कुरई,जि.सिवनी (मध्यप्रदेश), सुदीप श्रीराम सोनी (५१) रा.नाईक रोड महाल नागपूर, अमित मनोहर अग्निहोत्री (३५), रा.धनगवळीनगर हुडकेश्वर नागपूर, अतुल देविदास डुकरे(४२), रा.प्लॉट क्रमांक ६६ आशीर्वादनगर नागपूर व विनोद मंगलसिंह प्रधान (४७) रा.करडी, ता.मोहाडी, जि.भंडारा अशी आरोपींची नावे आहेत. सोनी बंधू हे या प्रकरणातील मास्टरमाईंड आहेत.
गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत माजी मालगुजारी 'तलाव पुनर्बांधणी व बळकटीकरण’ या लेखाशीर्षाखाली असलेल्या युनियन बँक खात्यातून आरटीजीएसच्या माध्यमातून रक्कम लंपास करण्यात आली होती. बॅंक खात्यात ६ कोटी २२ लाख ५९ हजार ३५१ रुपये शिल्लक असताना २ कोटी ८६ लाख रुपये एवढी रक्कम लंपास झाल्याचे १८ सप्टेबर २०१९ रोजी जिल्हा जलसंधारण अधिकारी भूपेश दमाहे यांनी बँकेत चौकशी केली असता लक्षात आले. अज्ञात आरोपीचा जलसंधारण विभागाशी कोणताही संबंध नसताना त्यांनी बनावट धनादेश तयार करून व मुख्य कार्यपालन अधिकारी आणि जलसंधारण अधिकाऱ्यांच्या सह्या स्कॅन करून जलसंधारण विभागाचे बनावट पत्र तयार केले. जून २०१९ रोजी हे पत्र युनियन बँकेत टाकून ६ जूनला बनावट पत्र व ७ जूनला धनादेश सादर केला आणि १० जूनला पत्रात नमूद असलेल्या खात्यावर आरटीजीएसच्या माध्यमातून तब्बल २,८६,१३,८५१ रुपये इतकी रक्कम काढून नेली. ही रक्कम आरोपींनी रामदूत कन्स्ट्रक्शन कंपनी, उत्कर्ष निर्माण कंपनी, पवनसूत कन्स्ट्रक्शन कंपनी इत्यादी कंपन्यांच्या खात्यांमध्ये वळती केली.
यासंदर्भात जिल्हा जलसंधारण अधिकारी भूपेश दमाहे यांनी गडचिरोली पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हे दाखल केल्यानंतर हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. त्यानंतर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनात ६ पथके गठित करुन वेगवेगळ्या ठिकाणांहून आरोपींना अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, सहायक पोलिस निरीक्षक विक्रांत सगणे, पोलीस उपनिरीक्षक भागवत कदम, पोलीस उपनिरीक्षक पूनम जगताप यांनी ही कारवाई केली.
आणखी काही मासे गळाला लागणार
दरम्यान, आरोपींनी जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाच्या बँक खात्याच्या माहितीपासून ते बँक खात्यातून रक्कम काढेपर्यंत जिल्हा परिषदेचे वा अन्य ठिकाणचे कोणते कर्मचारी त्यांच्या संपर्कात होते, आरोपींना नेमकी कुणी माहिती पुरवली, याविषयीची इत्थंभूत माहिती आरोपींकडून पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.