गडचिरोली - उपविभाग एटापल्ली अंतर्गत कोटमी पोलीस मदत केंद्राच्या कोकोटी जंगल परिसरात गडचिरोली पोलिसांच्या विशेष अभियान पथकासह विशेष कृती दल व पोलीस मदत केंद्र कोतमीचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवत असताना नक्षलवाद्यांनी घातपाताचा कट रचला होता. मात्र, हा कट उधळून लावण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. जवानांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त केले आहे.
जवान नक्षलविरोधी अभियान राबवत असताना कोकोटी गावाच्या जंगलात पहाडी भागात नक्षलवाद्यांचे कॅम्प लागले असल्याच्या संशयास्पद हालचाली जवानांना दिसून आल्या. जवान समोर कूच करत असताना घातपात घडविण्याच्या तयारीत असलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांचा वाढता दबाव पाहून घनदाट जंगलात पसार झाले.
दोन बॉम्ब केले निकामी-
जवानांनी घटनास्थळावर शोध मोहीम राबवली असता प्लास्टिक शीट, भांडे, भाजीपाला असे अनेक जीवनावश्यक साहित्य सापडून आले. जवानांनी परिसरात शोध अभियान राबवले असता पहाडीच्या पूर्व दिशेला एक व पश्चिम दिशेला एक असे दोन इलेक्ट्रॉनिक वायर आढळून आले. तेव्हा अधिक शोध अभियान राबवले असताना नक्षलवाद्यांनी घातपाताचा दृष्टीने जमिनीत इलेक्ट्रॉनिक बॉम्ब पेरून ठेवल्याचे निदर्शनास आले. तेव्हा गडचिरोली पोलिसांच्या बीडीएस पथकाने जागेवरच दोन्ही इलेक्ट्रॉनिक बॉम्ब निकामी केले.
रेगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल-
कोटमी या भागात सक्रिय असणाऱ्या नक्षलवाद्यांची कंपनी क्रमांक-4 चा कमांडर प्रभाकर उर्फ रवी राव तसेच कसनंसुर दलम कमांडंट व त्यांच्या सहकारी नक्षलवाद्यांवर रेगडी पोलीस मदत केंद्रात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवानांच्या शौर्यपूर्ण कामगिरीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी कौतुक केले आहे.