गडचिरोली - नक्षलवाद्यांच्या उत्तर गडचिरोली जिल्हा सदस्यपदी कार्यरत असलेला विलास ऊर्फ दसरु केये कोल्हा (वय ४४ रा. विकासपल्ली, एटापल्ली) याने गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. वर्षभरात विविध चकमकीत माओवाद्यांचा झालेला खात्मा आणि हिंसाचाराला कंटाळून कोल्हाने आपल्या एके-४७, तीन मॅगजिन आणि ३५ राऊंडसह आत्मसमर्पण केले. त्याच्या नावावर पोलिसांनी ९ लाख ५० हजारांचे बक्षीस ठेवलेले होते.
गडचिरोली जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यात त्याच्यावर ४० खून, ५७ चकमकी, जाळपोळीचे २४, दरोडा ८, अपहरण १, इतर १७ असे तब्बल १४७ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. गडचिरोली पोलीस दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने मागील काही दिवसांपासून नक्षलवाद्यांविरोधात राबवलेले आक्रमक अभियान, सी-६० कमांडोंनी नक्षलवाद्यांवर ठेवलेला अंकुश आणि नक्षलींचा केलेला खात्मा या सर्व बाबींना कंटाळून आपण एके-४७ सह पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासमोर आत्मसमर्पण करत असल्याचे विलास कोल्हाने सांगितले.
विलास कोल्हा हा २००० मध्ये एटापल्ली दलामध्ये भरती झाला होता. त्यानंतर जानेवारी २००३ पर्यंत तेथेच कार्यरत होता. त्यानंतर तो 'स्टाफ टीम डीव्हीसी विकासच्या' उत्तर डी व्हीजनमध्ये डेप्युटी कमांडर म्हणून डिसेंबर २००४ पर्यंत कार्यरत होता. २००५ मध्ये त्याला टिपागड दलम कमांडर म्हणून पदोन्नती देण्यात आली. नोव्हेंबर २००७ ला टिपागडमधून तो चातगाव दलम मध्ये आला. नोव्हेंबर २००८ ला डिव्हीसी पदावर पदोन्नती देण्यात आली. या व्यतिरिक्त त्याने गोंदिया जिल्ह्यातील दरेकसा डीव्हीसी, कोरची दलम डीव्हीसी आणि मागील चार महिन्यांपासून तो चातगाव दलममध्ये डीव्हीसी म्हणून कार्यरत होता. गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर भागातील लोकांमध्ये त्याने दहशत पसरवली होती.
हेही वाचा - दिल्ली पोलीस आयुक्तपदी एस. एन श्रीवास्तव यांची नेमणूक
महाराष्ट्र शासनाने विलास कोल्हावर ९ लाख ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले होते. विलास कोल्हा याने स्वत:हून आत्मसमर्पण केल्यामुळे त्याला शासनातर्फे आणखी १ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. गेल्या वर्षभरापासून विलास कोल्हासह ४ डिव्हीजनल कमिटी मेंबर, २ कमांडर, २ डेप्युटी कमांडर, २६ दलम/कंपनी/प्लाटून सदस्य आणि १ जनमिलीशीयाने गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.