गडचिरोली - नक्षलवाद्यांनी आज (19 मे) रोजी पुकारलेल्या बंदला गडचिरोलीतील अनेक गावकऱ्यांनी विरोध केल्याचे दिसून येत आहे. गावकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेत नक्षलवाद्यांनी लावलेले बॅनर काढून टाकत बॅनरची होळी केली व घोषणा दिल्या.
नक्षलवाद्यांनी 'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९'च्या मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. मात्र, गडचिरोलीतील दुर्गम व अतिदुर्गम भागातील जनतेने त्यांचे आवाहन मोडीत काढत स्वतःहून घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला आपला पाठींबा असल्याचे दाखवून दिले होते. यामुळेच महाराष्ट्र राज्यात सर्वांत जास्त मतदानाची टक्केवारी ही गडचिरोली जिल्ह्यात नोंदवली गेली होती.