गडचिरोली - सध्या गडचिरोली जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेषत: ग्रामीण भागात लग्न, विवाह समारंभामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी करण्याचे प्रमाण दिसून येत आहे, ज्यामुळे कोरोना साथरोग ग्रामीण भागातसुद्धा मोठ्या प्रमाणावर पसरण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित करून लग्नसमारंभात उपस्थितांच्या संख्येपेक्षा अधिक लोक आढळल्यास त्या ठिकाणी वधुवर दोन्हीकडील व्यक्तींवर गुन्हे नोंदवण्यात येणार आहेत.
नियमाचे उल्लंघन झाल्यास तलाठी, ग्रामसेवकाचे निलंबन -
लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त २५ लोकांना उपस्थितीत राहण्यास परवानगी असून याचे उल्लंघन केल्यास संबंधित वर-वधु, त्यांचे आई-वडील, मंगल-कार्यालय/लॉन/सभागृह मालक, कॅटरर्स यांचेवर नियमाप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात येणार आहेत. संबंधित गावाचे तलाठी व ग्रामसेवक यांचेवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.
कडक अंमलबजावणी करणार -
एप्रिलमधील ग्रामीण भागातील कोरोना बाधितांची आकडेवारी पाहता जिल्ह्यात कोरोना संसर्ग अधिक गतीने वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. स्थानिक प्रशासनाला विविध ग्रामीण कार्यक्रमातील गर्दी कमी करणेबाबत व नियमानुसार कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याबाबत या अगोदरच सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार या आदेशाची अंमलबजावणी कडक स्वरूपात करणार असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.