गडचिरोली - महाराष्ट्र दिनाच्या दिवशी नक्षल्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात १५ पोलीस जवानांना वीरमरण आले. तसेच वाहनाचा चालकही ठार झाला होता. आता त्या वाहन चालकालाही शहिदाचा दर्जा देऊन शहीद पोलीस जवानांप्रमाणे सुविधा द्याव्या आणि त्याच्या पत्नीला अनुकंपाची नोकरी द्यावी, अशी मागणी चालक तोमेश्वर सिंगनाथ यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
तोमेश्वर यांच्या पत्नी वंदना सिंगनाथ, वडील भागवत सिंगनाथ, आई मायाबाई सिंगनाथ यांनी 'ईटीव्ही'शी बोलताना आपली व्यथा मांडली. तोमेश्वर हे एका व्यावसायिकाकडे चालक म्हणून कार्यरत होते. त्या व्यावसायिकाकडून स्थानिक पोलीस नेहमी वाहनांची मागणी करत असायचे. महाराष्ट्र दिनी तोमेश्वरला एका लग्नाचे वराडी घेऊन चारभट्टी येथे जायचे होते. मात्र, अचानक पोलिसांनी वाहनाची मागणी करून पार्टी पोहोचवून देण्यास सांगितले. पोलिसांचे काम असल्यामुळे तोमेश्वर नकार देऊ शकला नाही. घरी येऊन त्याने जेवण केले. त्यानंतर पत्नी आणि आईला सांगून तो घरून निघून गेला. मात्र, दुपारी एक वाजताच्या सुमारास वार्ता आली ती निधनाची.
कुटुंबीयांना पोलीस मुख्यालयात बोलावून शासकीय इतमामात इतर जवानांप्रमाणे त्यालाही मानवंदना देण्यात आली. याच वेळी त्याच्या कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत म्हणून ५० हजार रुपये देण्यात आले. मात्र घरचा कर्ता व्यक्ती गेला, पत्नीचे छत्र हरपले, आई-वडिलांचा म्हातारपणाचा सहारा गेला, हे दुःख कुटुंबीयांना कायम राहणार आहे. तोमेश्वर यांचे वडिल म्हणाले, माझा मुलगा तर परत मिळणार नाही. मात्र शहीदजवानांप्रमाणे माझ्या मुलालाही शहिदाचा दर्जा देऊन त्याच्या पत्नीला अनुकंपाची नोकरी द्यावी आणि कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.