गडचिरोली - शेतकऱ्याकडून २५ हजारांची लाच घेताना नवेगावमध्ये वनरक्षकाला रंगेहात अटक करण्यात आली आहे. गडचिरोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही कारवाई केली.
हेही वाचा - कोरोना व्हायरस : ३२३ भारतीयांसह मालदिवच्या 7 नागरिकांना घेऊन विमान दिल्लीत दाखल
नवेगाव (रै) बिटाचा वनरक्षक महेश नामदेव तलमले (४०) असे या लाचखोराचे नाव आहे. रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तक्रारदाराच्या पत्नीला शासनाकडून १ लाख २५ हजार रुपयांची मदत शासनाने मंजूर केली होती. परंतु ही रक्कम आपण मंजूर केल्याचे सांगत त्याचा मोबदला म्हणून तलमले याने तक्रारकर्त्याला २५ हजारांची मागणी केली होती.
हेही वाचा - कोरोना विषाणू : केरळात 'कोरोना'चा दुसरा रुग्ण
याबाबत तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार शेतशिवारात सापळा रचून पंचांसमक्ष पैसे स्वीकारताना तलमले याला अटक करण्यात आली. त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (संशोधन २०१९) नुसार चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.