गडचिरोली - कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम गावागावांमध्ये 'मुक्तिपथ' अभियानाच्या कोरोनाविषयी जनजागृती करण्यात येत आहे. कोरोनाबाबत आवश्यक उपाययोजनांची माहिती लोकांना देण्यात येत आहे.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हास्तरावर विविध उपाय केले जात आहेत. तर लहान-लहान गावांमध्ये पसरलेल्या गडचिरोली जिल्ह्यात लोकांपर्यंत आवश्यक सूचना पोहोचवणे खूप आवश्यक आहे. ही गरज ओळखून गडचिरोली जिल्हा दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या 'मुक्तिपथ' अभियानाद्वारे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती केली जात आहे.
चित्ररथाच्या माध्यमातून लोकांनी घराबाहेर पडू नये, वारंवार हात धुवावे याविषयी माहिती दिली जात आहे. तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणारे लोक सतत थुंकत असतात. त्यामुळे राज्य शासनाने वर्षभरासाठी पानठेले बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमाची काटेकोर अंमलबाजवणी करण्यासाठी कोरोना नको, पानठेला नको, खर्रा नको असेही मुक्तिपथद्वारे गावा-गावात सांगिण्यात येत आहे.