गडचिरोली - गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ रविवार ७ एप्रिलला गडचिरोली येथे सायंकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. मात्र, सभा सुरू होण्याच्या अर्धातास अगोदर अमित शाह यांचा गडचिरोली दौरा रद्द झाला. त्यामुळे राज्याचे वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. मात्र, शाह गडचिरोली येथे न आल्याने सभेला गर्दी केलेले शेकडो नागरिक हिरमुसल्या चेहऱ्याने घरवापसी करताना दिसून आले.
गडचिरोली येथील चंद्रपूर मार्गावरील देवकुले लेआउटवर सायंकाळी चार वाजता विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी जिल्हाभरातील जवळपास १० हजार नागरिकांनी सकाळपासूनच येथे गर्दी केली. दुपारी दोन वाजतापासून स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत सभेला सुरुवात झाली. यावेळी मंचावर उमेदवार अशोक नेते, पालकमंत्री अमरीश आत्राम, आमदार देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, आमदार बंटी भांगडिया, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सायंकाळी चार वाजता सुरू होणाऱ्या सभेसाठी जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या हेलिपॅडवर अमित शाह यांचे हेलिकॉप्टर उतरणार होते. यासाठी पूर्ण प्रक्रिया पार पडली. शहरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. मात्र, सभेच्या अर्ध्या तासापूर्वी अमित शाह यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती माध्यमांमध्ये पसरली. याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांना विचारणा केली असता, शाह यांच्या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यावरून समस्या निर्माण झाल्याने ते गडचिरोलीला येत नसल्याचे सांगितले. मात्र, याबाबत सभेत कुठलीही घोषणा करण्यात आली नाही.
त्याचवेळी राज्याचे वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार सभास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सुमारे अर्धा ते पाऊण तास नागरिकांना संबोधित केले. मात्र, नागरिक अमित शाह येणार नाहीत, या वृत्तपासून अनभिज्ञ होते. त्यावेळेस सुधीर मुनगंटीवार यांचे भाषण संपले. तेव्हा ही घोषणा करण्यात आली. तेव्हा मात्र नागरिक नाराज झाले आणि हिरमुसल्या चेहऱ्याने घराकडे परतू लागले.