गडचिरोली - तेलंगाणातून महाराष्ट्राच्या हद्दीत गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करताच एका व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. सिरोंचा तालुक्यातील रामंजापूर येथील एक दांम्पत्य मजुरीच्या कामासाठी तेलंगाणाच्या करिमनगर येथे गेले होते. तिथे मजुरीसाठी काम करत असताना पाच एप्रिलपासून सदर व्यक्तीची प्रकृती बिघडली होती. त्याच्यावर करिमनगर येथे एका खासगी रुग्णालयात उपचार झाले होते. काल शनिवारी या कुटूंबाने स्वागावी परतण्याचा निर्णय घेतला. खासगी वाहनाने ते प्राणहिता नदीच्या पुलावरील तेलंगाणाच्या सीमेपर्यंत पोहोचले.
मजुर त्याची पत्नी, चौदा वर्षाचा मुलगा आणि दोन वर्षाची मुलगी हे सोबत होते. धर्मपुरी येथील चेकपोस्टवर त्याना उतरवून ते वाहन तेलंगाणात परत गेले. त्यानंतर प्राणहिता नदीच्या पुलावरुन हे चौघे पायी महाराष्ट्राच्या हद्दीत दाखल झाले. धर्मपुरी येथील शासकीय आश्रमशाळेजवळ येताच, मजुराला अस्वस्थ वाटू लागल्याने चौघे तिथे थांबले. काही वेळातच त्या मजुराचा मृत्यु झाला.
गडचिरोली जिल्ह्यात एकही कोरोनाबाधीत रुग्ण नसल्याने तेलंगाणातून आलेल्या या व्यक्तीचा महाराष्ट्राच्या हद्दीत दाखल होताच मृत्यु झाल्याने प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे. या घटनेची माहिती मिळताच सिरोंचा पोलीस ठाण्यातून पोलीस पथक, वैद्यकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचली. मृतासह चौघांचे स्वॅब घेऊन कोरोनाच्या तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.