गडचिरोली - नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र दिनाला गालबोट लागले आहे. आज नक्षलवाद्यांनी सी-६० कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात १६ जवानांना वीरमरण आले आहे.
मंगळवारी मध्यरात्री कुरखेडा तालुक्यातील दादापूर(रामगड) येथे नक्षल्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील तब्बल २७ वाहने, यंत्रसामग्री व कार्यालये जाळली.
त्यानंतर आज (बुधवार) सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास सी-६० पथकातील जवान खासगी वाहनाने कुरखेडा येथून पुढे जात असताना कुरखेड्यापासून जवळच्या अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळील पुलावर नक्षलींनी भूसुरुंग स्फोट घडवला.
यात १६ जवानांना वीरमरण आले आहे.
त्यानंतर पोलिसांकडून परिसरात कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.
या घटनेने अवघा महाराष्ट्र हळहळला आहे.
या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोक व्यक्त केला आहे.