धुळे - जिल्हा परिषद पंचायत समितीसह जिल्ह्यातील उर्वरित चारही पंचायत समितींच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाला आज उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. बुधवारी जाहीर होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धुळे जिल्हा परिषदेवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकतो, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
हेही वाचा- 'हे सरकार खोटारड्यांचं; तोंड उघडलं की खोटं बोलतात'; अनुराग कश्यप यांची रोखठोक प्रतिक्रिया!
धुळे जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच दोंडाईचा, शिरपूर शिंदखेडा आणि साक्री या चारही पंचायत समितीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली असून विविध मतदान केंद्रांवर मतदारांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे. मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धुळे जिल्हा परिषदेच्या 51 गटासाठी 216 तर 110 गणांसाठी 397 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
तब्बल 1 हजार 255 मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया पार पाडत आहे. यासाठी 1 हजार 400 ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले आहेत. तर या निवडणुकीसाठी तब्बल 12 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजवणार आहेत. धुळे जिल्हा परिषदेवर गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसने एक हाती सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर प्रथमच ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामुळे भाजपला जिल्हा परिषदेवर विजय प्राप्त करण्यासाठी महाविकास आघाडीचे आव्हान समोर असल्याने ही निवडणूक कोण जिंकते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
- धुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 9:30 पर्यंत 8.11 टक्के मतदान