धुळे - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात पुकारलेल्या भारत बंद दरम्यान आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या बंददरम्यान आंदोलनाला हिंसक स्वरूप देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी धुळे शहरातून भाजपसह विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.
हेही वाचा - भारत बंदवेळी दगडफेक करणारे नऊ जण पोलिसांच्या ताब्यात
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी भारत बंदची हाक देण्यात आली होती. या भारत बंददरम्यान धुळे शहरातील 100 फुटी रोड येथे आंदोलनकर्त्यांनी दगडफेक करत पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ केली. या घटनेत काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले. या घटनेचे शहरात तीव्र पडसाद उमटत असून या घटनेच्या निषेधार्थ भाजपसह विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने शहरातील मनोहर चित्र मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.
हेही वाचा - आंदोलकांनी पोलिसांवर केलेल्या हल्ल्याचा सेनेकडून निषेध, कठोर कारवाईची मागणी
या मोर्चात भाजपाचे पदाधिकारी तसेच हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्यासह विविध पोलीस अधिकारी या मोर्चावर लक्ष ठेवून होते. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेला हा मोर्चा धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चाच्या शिष्टमंडळाने अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
हेही वाचा - धुळ्यात भारत बंदला हिंसक वळण, दगडफेक करत वाहनांची तोडफोड
आंदोलन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, दर महिन्याला कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात यावे, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना परवानगी देण्यात येऊ नये, या मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. दरम्यान, या मोर्चामुळे शहरातील वाहतूक काही काळासाठी विस्कळित झाली होती.