धुळे - शहरातील देवपूर भागातील एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली असल्याचे सायंकाळी समोर आले आहे. यामुळे हा परिसर सील करण्यात आला असून याठिकाणी असलेल्या नागरिकांची तपासणी केली जाणार आहे.
देवपुर भागात खासगी दवाखाना चालवणाऱ्या एका डॉक्टरचा अहवाल सायंकाळी पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. हा परिसर दाट वस्तीचा असल्याने संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. तसेच या डॉक्टरकडे तपासणीसाठी आलेल्या इतर रुग्णांची माहिती घेऊन त्यांची तपासणी करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. हा परिसर प्रशासनाच्या वतीने सील केला असून कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
दरम्यान, आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या पस्तीस झाली असून त्यातील 14 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सहा जणांचा मृत्यू झाला असून उर्वरित रुग्णांवर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.