धुळे - जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील प्रडांगरी येथील एका २२ वर्षीय गर्भवती महिलेचा अमळनेर येथील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतर धुळे जिल्हा रुग्णालयात या महिलेचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; जन्मदिनीच डॉक्टरसह चालकाचा मृत्यू
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील प्रडांगरी येथील जयश्री सुधाकर कोळी या २२ वर्षीय तरुणीचा एप्रिल महिन्यात विवाह झाला होता. जयश्री ६ महिन्यांची गर्भवती होती. तिला गेल्या २ दिवसांपूर्वी ताप भरला होता. त्यामुळे अमळनेर येथील डॉ. निखिल रमेश बहुगुणे यांच्या रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. यावेळी डॉ. बहुगुणे यांनी जयश्रीची सोनोग्राफी करण्यास सांगितले. सोनोग्राफीचा रिपोर्ट नॉर्मल आहे. काळजी करण्याच कारण नाही, असे बहुगुणे यांनी जयश्रीच्या नातेवाईकांना सांगितले. मात्र, मंगळवारी रात्री १२ वाजता जयश्रीची प्रकृती अचानक बिघडली. याबाबत डॉक्टरांना सांगितल्यावर त्यांनी जयश्रीला धुळ्याला हलवण्यास सांगून जबाबदारी झटकली. तिला रुग्णवाहिकेत टाकल्यावर तिची तब्येत जास्त बिघडली. तिचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूला आपण जबाबदार नसून तुम्हीच जबाबदार असल्याचे डॉक्टर म्हणाले. जयश्रीला नेमका काय त्रास झाला? याबाबत डॉक्टरांना न कळाल्याने तिचा मृत्यू झाला. त्यामुळे तिच्या मृत्यूला डॉक्टरांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप जयश्रीच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी डॉ. निखिल बहुगुणे यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.