धुळे - पोलिसांनी स्विफ्ट गाडीतील पाच संशयित दरोडेखोरांना ताब्यात घेतले. ही घटना रविवारी रात्री साक्री रोडवर घडली. या दरोडेखोरांकडून २ पिस्तूलसह जीवंत काडतुसे जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विजय उर्फ छंग्गा सरजीत बेंडवाल, सत्तु भैरू राजपूत, राहुल अजय उजैनवाल, सुमित मनोहर अवचिते, वाहन चालक इरफान नईम शेख या संशयितांना पोलिसांनी पकडले आहे.
धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील यांना रोड परिसरात पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार क्र ( एमएच १५-इइ ०५३९ ) यात काही तरुण संशयितपणे फिरत असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. त्यावरुन पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सर्व रात्रगस्त कर्मचाऱ्यांना अलर्ट केले व साक्री रोड परिसरात संशयितांच्या स्विफ्ट वाहनाचा शोध घेण्यासाठी सूचना दिल्या. यावेळी साक्री रोड फिरुन मलेरिया ऑफिसकडून साक्री रोडवर सुरेंद्र डेअरीकडे येताना एक कार एकदम जोरात येताना पोलिसांना दिसले. यावेळी शोध पथकाचे कर्मचारी मुक्तार मनसुरी, योगेश चव्हाण, पंकज खैरमोडे, कमलेश सुर्यवंशी, राहुल गिरी, भिका पाटील, संदिप पाटील आदी पथकातील पोलीस कर्मचारी खासगी मोटर सायकलीवर पाठलाग करताना दिसले.
संशयित स्विफ्ट वाहनासमोर जयभवानी स्टील ट्रेडर्स धुळे दुकानासमोर रोडवर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, यांच्या आदेशान्वये शासकीय वाहन उभे करुन स्विफ्ट गाडीला जागीच थांबण्यास भाग पाडले. या स्विफ्ट गाडीत विजय उर्फ छंग्गा सरजीत बेंडवाल ( वय २२ रा.जयभवानी रोड फर्नांडिस वाडी नाशिक ), सत्तु भैरू राजपूत ( वय २० मुळ रा.बडीसाजडी जि. चितोडगड राजस्थान हमु रोकडोबा वाडी जयभवानी रोड नाशिक ), राहुल अजय उजैनवाल ( वय २० रा.जयभवानी रोड नाशिक ), सुमित मनोहर अवचिते ( वय २३ रा.कँनल रोड,मगर चाळ जेल रोड नाशिक ), वाहन चालक इरफान नईम शेख ( वय २४ रा. डिकले नगर, जेलरोड संजेरी हाऊस नाशिक ) हे मिळून आले. यापैकी दोन जणांच्या कमरेत पँटमध्ये खोसलेले पिस्तूल व काडतूस व उर्वरित संशयितांकडे कारमध्ये घातक शस्त्र, सुरा व लोखंडी सळई, मिरची पुडी, दोरी, बॅटरी आदी साहित्य आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी या सामानासह ४ मोबाईल व २८२० रोख रुपये, स्विफ्टकार ३ लाख ८२ हजार ८२० असा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलीस अधिक्षक चिन्मय पंडित यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधिक्षक राजु भुजबळ उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने केली.