धुळे - साक्री तालुक्यातील पिंपळनेरजवळील शेवगे गावात रेशन दुकानदाराची चौकशी करण्यात येते आहे. रेशन दुकानाच्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात धान्यसाठा आढळल्याने पुरवठा अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे. या भागातील आदिवासी आणि गरजूंना वेळेवर धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अवैध धान्य साठा
साक्री तालुक्यातील पिंपळनेरजवळील शेवगे गावात धान्य व्यापारीच्या गोडाऊनमध्ये अवैधरीत्या जमा केलेला रेशनचा गहू व मका मोठ्या प्रमाणात आढळला. संबंधित गोडाऊनची संपूर्ण तपासणी करण्यासाठी पुरवठा अधिकारी त्याठिकाणी पोहोचले. इतक्या मोठ्या प्रमाणात रेशन धान्याचा साठा या दुकानदाराने कशा पद्धतीने व कशासाठी केला आहे, याची संपूर्ण माहिती घेण्याचे काम पुरवठा विभागातर्फे सुरू आहे.
लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य नागरिकांना देण्यात येणारे धान्य रेशन दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणात हडपल्याच्या घटना समोर आल्या होत्या. शेवगे गावात गोडाऊनमध्ये आढळलेले मोठ्या प्रमाणात धान्य देखील दुकानदारांनी अशाच प्रकारे साठा करून ठेवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.