धुळे - येणाऱ्या निसर्ग चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी व कोणतीही अडचण आल्यास पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा असे, आवाहन धुळ्याचे पोलीस अधिक्षक चिन्मय पंडित यांनी केले आहे.
अरबी समुद्रात घोंगावणारे निसर्ग चक्रीवादळ धुळे जिल्ह्यात धडकण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली आहे. नागरिकांनी या काळात स्वतःची काळजी घ्यावी, लहान मुलांची आणि जेष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी, समाज माध्यमांवरील अफवांवर विश्वास ठेऊ नये, नागरिकांना कोणतीही अडचण आल्यास त्यांनी 100 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे अधिक्षक पंडित यांनी सांगितले.
दरम्यान, या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. प्रत्येक तालुक्यात आपत्ती निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. आज दुपारी निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीला धडकले असून त्याचा प्रवास नाशिकमार्गे धुळ्यापर्यंत होण्याची शक्यता आहे.