धुळे- जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या दीड दिवसांच्या लॉकडाऊनला धुळेकर नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. शहरातील मुख्य बाजारपेठेसह महामार्गावर शुकशुकाट पसरली होती.
धुळे जिल्ह्यातील शिरपूरपासून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या सेंधवा येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच मालेगाव येथे रुग्णांची संख्या वाढत आहे, या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने दीड दिवसांचा सक्तीचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता, याची अंमलबजावणी शुक्रवारी रात्री बारा वाजेपासून सुरू करण्यात आली आहे.
रविवारी पहाटे पाच वाजेपर्यंत हा सक्तीचा लॉकडाऊन असणार आहे. यादरम्यान मेडिकल वगळता अन्य सर्व आस्थापना बंद ठेवली आहेत. प्रशासनाच्या आवाहनाला धुळेकरांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचे चित्र पहायला मिळाले यावेळी शहरातील विविध भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.