धुळे - राहुल गांधींनी निवडणुकीपूर्वीच हार मानली आहे. त्यामुळे ते बँकॉकला जाऊन बसले आहेत. आमचे पैलवान अंगाला तेल लावून बसले आहेत. मात्र, मैदानात कोणीच नाही. काँग्रेस राष्ट्रवादीची अवस्था 'आधे इधर-आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ' अशी झाली आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर कडाकडून टीका केली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभांना उत्तर महाराष्ट्रातून सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील नेर साक्री आणि शिरपूर येथे शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले काशिराम पावरा यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री अमरीष पटेल, धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते यांनी प्रवेश केला. अमरीश पटेल यांच्या भाजप प्रवेशामुळे शिरपूर तालुक्यातून काँग्रेसला खिंडार पडले आहे.
अमरीश पटेल यांच्या रुपाने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या वंशातील सद्स्य भाजपमध्ये आल्याने मला त्याचा मनस्वी आनंद आहे. शिरपूर विधानसभा मतदार संघाचा विकास अमरीश पटेल यांनी स्वबळावर केला आहे. मात्र, काँग्रेसने अमरिश पटेल यांना कधीही मदत केली नाही. विरोधकांनी तयार केलेला जाहीरनामा पाहिला तर आपण निवडून येणार नाही हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे त्यांनी जगातली सगळी आश्वासन मतदारांना दिली आहेत. फक्त प्रत्येकाला ताजमहाल बांधून देऊ एवढेच आआश्वासन देण्याचे बाकी ठेवले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
गेल्या ५ वर्षात भाजपने शिक्षण क्षेत्र, रोजगार, औद्योगिक विकास यासह सर्वच क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे. शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, पुढील पाच वर्षात तो पहिल्या क्रमांकावर असेल, असा विश्वास देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पुढील पाच वर्षात महाराष्ट्र बेरोजगारीमुक्त आणि दुष्काळमुक्त करू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. याप्रसंगी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. हिना गावित, धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.