धुळे - देशाला एकसंध ठेवण्यासाठी कलम ३७० हटवले गेले. काँग्रेस, राष्ट्रवादीने काश्मीरचा उपयोग फक्त सत्तेसाठी केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकीत यांना जनता घरी बसवेल, असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र यादव यांनी धुळ्यात व्यक्त केला. त्यांच्या उपस्थितीत धुळ्यात भाजपचा संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्याला उत्तर महाराष्ट्रातील आमदार, खासदार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील हॉटेल टॉप लाईन याठिकाणी उत्तर महाराष्ट्राचा संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्याला भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा हे उपस्थित राहणार होते. मात्र, काही कारणांमुळे ते उपस्थित राहू न शकल्याने भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला.
हेही वाचा - उदयनराजेंना पराभूत करण्यासाठी भाजपचे षडयंत्र; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा आरोप
यावेळी बोलताना भूपेंद्र यादव म्हणाले, महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून गेल्या ५ वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा मुख्यमंत्र्यांनी जनतेसमोर मांडला. या यात्रेला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद हीच त्यांच्या यशाची पावती आहे. भारताला एकसंध ठेवण्यासाठी कलम ३७० हटवले गेले. यामुळे देशातील जनता भाजपला भरभरून आशीर्वाद देत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने काश्मीरचा उपयोग फक्त सत्तेसाठी केला. आज भाजपमध्ये येणारे हे मुख्यमंत्र्यांचे काम पाहून येत आहेत. या निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळण्यासाठी सगळ्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या मेळाव्याला उत्तर महाराष्ट्रातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
हेही वाचा - भाजप सरकारचा शिवस्मारकात कोट्यवधींचा भ्रष्टाचार; काँग्रेस-राष्ट्रवादीचा आरोप
याप्रसंगी खासदार डॉ. सुभाष भामरे, खासदार डॉ. हिना गावित, गिरीश महाजन, जयकुमार रावल, एकनाथ खडसे, हरिभाऊ जावळे, संजय सावकारे, स्मिता वाघ, राजूमामा भोळे, खासदार रक्षा खडसे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.