चंद्रपूर - राज्य शासनाच्या शिवभोजन योजनेचे रविवारी बसस्थानकातील केंद्रात जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी जेवणाची चव न चाखताच वडेट्टीवार परतले. या योजनेच्या माध्यमातून गरिबांना केवळ दहा रुपयांत थाळी मिळणार आहे.
हेही वाचा - तुमचा 'हा' प्रतिनिधी महाराष्ट्राचा चेहरा बदलेल - शरद पवार
जिल्ह्यात शिवभोजन योजनेची ३ केंद्र उघडण्यात आली आहेत. या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान खासदार बाळू धानोरकर, स्थानिक आमदार किशोर जोरगेवार हे देखील उपस्थित होते. मात्र, यापैकी एकानेही शिवथाळीचा आस्वाद घेतला नाही. जवळपास अर्धा तास हे सर्व लोकप्रतिनिधी येथे होते. त्यांनी शिवभोजन केंद्राचा आढावाही घेतला. मात्र, जे जेवण सर्वसामान्य नागरिकांना दिले जाणार आहे, त्याचा दर्जा नेमका कसा आहे, हे जेवण खाण्यायोग्य आहे की नाही? याची चाचपणी एकाही लोकप्रतिनिधीने केली नाही.
हेही वाचा - लंगोट न नेसलेल्याला तुम्ही गदा दिली - अजित पवार
२५ जानेवारीला जिल्हा क्रीडा संकुलातील 'रनिंग ट्रॅक' च्या भूमिपूजनावेळी पाहुण्यांसाठी विशेष भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री वडेट्टीवार, खासदार धानोरकर आणि आमदार जोरगेवार एकाच टेबलावर बसून जेवले होते. मात्र, आज सर्वसामान्यांसाठी असलेल्या शिवभोजन योजनेतील जेवणाची साधी चवही या लोकप्रतिनिधींनी घेतली नाही.