चंद्रपूर Sachin Tendulkar Tiger Safari : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ताडोबा अभयारण्याचं नातं दिवसेंदिवस घट्ट होत चाललंय. ताडोबाच्या जंगलाची जणू सचिनला भुरळच पडलीय. दरवर्षी सचिन आवर्जून येथे भेट देतो. या वर्षाच्या अखेरीस देखील सचिन येथे कुटुंब आणि मित्रांसोबत दाखल झाला असून गुरुवारी (21 डिसेंबर) त्यानं जंगल सफारी केली. यावेळी कोलारा गेट येथून केलेल्या सफारीत त्याला तारा, बबली, बिजली आणि युवराज या वाघांचं दर्शन झालं.
ताडोबात तीन दिवस राहणार मुक्कामी : सचिन आपली पत्नी अंजली तेंडुलकर आणि काही मित्रांसह गुरुवारी ताडोबात दाखल झाला. येथील बांबू रिसॉर्ट हे त्याचं आवडतं मुक्कामाचं ठिकाण आहे. नागपूर-उमरेड मार्गे तो येथे दाखल झाला. नेहमीच सचिनच्या आगमनाबाबत रिसॉर्ट व्यवस्थापन कमालीची गुप्तता पाळत असते. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी रिसॉर्टमध्ये काही वेळ थांबून त्यांनी सायंकाळची पर्यटन सफारी कोलरा गेटद्वारे केली. तसंच पुढील तीन दिवस सचिन ताडोबात मुक्कामी असणार आहे. या तीन दिवसांत तो ताडोबाच्या वेगवेगळ्या प्रवेशद्वारातून सफारी करणार आहे. सफारीच्या पहिल्याच दिवशी कोलाराचे विशेष आकर्षण असलेले तारा, बबली, बिजली आणि युवराजने सचिनला दर्शन दिले. मात्र, यावेळी त्यांना माया वाघिणीचे दर्शन होऊ शकले नाही.
वर्षभरात तिसऱ्यांदा दिली भेट : सचिन तेंडुलकरची या वर्षातील ताडोबातील ही तिसरी सफारी आहे. आतापर्यंत सहा वेळेस त्यानं ताडोबा सफारी केली आहे. विशेष म्हणजे सचिनला माया वाघिणीचा चांगला लळा आहे. याबाबत त्यानं आपल्या सोशल मीडियावर देखील अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. माया वाघिणीचा निमढेला, अलिझंजा आणि नवेगाव क्षेत्रात मुक्त संचार होता. त्यामुळं प्रत्येकवेळी ती सचिनला दर्शन द्यायची. मात्र, काही महिन्यांपासून माया ताडोबात दिसेनाशी झालीय. त्यामुळं यंदा माया वाघिणीचं दर्शन न घेताचं सचिनला परतावं लागेल, अशी शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा -