चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा-वायगाव रोडवरील एका शेतात वाघ मृतावस्थेत आढळून आला. ह्या वाघाचा मृत्यू करंट लागून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज (गुरूवारी) दुपारच्या सुमारास ही घटना समोर आली.
भद्रावती तालुक्यात वाघाचा मृत्यू वरोरा तालुक्यात वाघांची संख्या वाढली आहे. दोन दिवसांपूर्वीच एक वाघ शिकारीचा पाठलाग करताना विहिरीत पडला होता. त्यानंतर एका वाघाने शेतकऱ्यावर हल्ला केला होता. त्यामुळे या तालुक्यात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोचला आहे. आजच्या घटनेने त्यात अजून भरच पडत आहे. एक वाघ चंदनखेडा-वायगाव मार्गावरील एका शेतात मृतावस्थेत आढळून आला. या वाघाचे वय अंदाजे तीन वर्षे असल्याची माहिती आहे. शेताच्या सीमेवर लावण्यात आलेल्या तारेच्या स्पर्शाने या वाघाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शेतपिकाला वाचविण्यासाठी शेतकरी आपल्या शेताच्या बाजूला विद्युत तार लावून ठेवतात. त्यात वाघाचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा - Gujarat Drug Case : दीड ग्रॅम ड्रग्ज पकडणाऱ्याने द्वारकेतल्या 350 किलो ड्रग्जचा तपास करावा - संजय राऊत