चंद्रपूर - जिल्ह्यातील चांदा वनविभाग क्षेत्रातील सूकवाशी बिटात शिकारी कुत्र्यांच्या मदतीने चितळाची शिकार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वनविभागाने चौघांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये आणखी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वनविभागाने वर्तवली आहे.
मध्य चांदा वनविभाग वनपरीक्षेत्र धाबा अंतर्गत येणाऱ्या सूकवाशी बिटातील कक्ष क्रमांक 156 मध्ये शिकारी कुत्र्यांच्या मदतीने चितळाची शिकार केल्याची माहिती वनविभागाला मिळाली. याप्रकरणी वनविभागाने नितेश मेश्राम, नारायण पंदीलवार, सिताराम कातलाम, शंकर कोडापे या चौघांना ताब्यात घेतले. त्या चौघांनीही दिलेल्या माहितीच्या आधारे वनविभागाने घटनास्थळ गाठले. त्याठिकाणी चितळाचे मुंडके, तुटलेले पाय आढळले. या शिकारीमध्ये आणखी काही जण सहभागी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काही महिन्यापूर्वी सुकवाशी बिटाला लागूनच असलेल्या वटराणा वनक्षेत्रात सांबराची शिकार झाली होती. वेडगाव येथेही शिकारीची घटना उघडकीस आली होती. धाबा वनक्षेत्राअंतर्गत शिकारीच्या घटना वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
वन्यजीव असुरक्षित -
धाबा वनक्षेत्रात वन्यजीवांचा संचार असतो. दूर्मिळ प्रजातीचे वन्यजीव येथे आढळतात. मागील वर्षी या वनक्षेत्रातील तीन वाघांची मृतावस्थेत आढळले होते. शिकारीचा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. वनविभागाचा कामचूकारपणामुळे वन्यजीव असुरक्षित असल्याचा आरोप वन्यजीव प्रेमींकडून केला जात आहे.