चंद्रपूर - चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांनी गरीब आणि गरजूंसाठी भोजन केंद्र सुरू केले. मात्र, या केंद्रांत सोशल डिस्टन्सिंगचे कुठलेही नियम पाळल्या जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. जेवण मिळवण्यासाठी येथे नागरिकांची झुंबड उडत असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कुठलेही नियोजन येथे करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्थिती अत्यंत धोकादायक आहे.
कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी लागू झाल्याने मोलमजुरी करणारे कामगार, गरीब आणि निराश्रित लोकांचे मोठे हाल होत आहे. त्यांना दोन वेळचे अन्नदेखील मिळत नाही. अशा लोकांना आधार मिळावा, या उद्देशाने आमदार बंटी भांगडिया यांच्या पुढाकारातुन कम्युनिटी किचन तयार करण्यात आले. या माध्यमातून चिमूर शहरात बारा ठिकाणी भोजन केंद्रे उघडण्यात आली. भोजनासाठी नागरिकांना पासेस वितरित करण्यात आले. दोन्ही वेळचे जेवण या भोजन केंद्रात मिळते.
दरम्यान, हे सर्व करीत असताना सोशल डिस्टन्सिंग ठेवणे गरजेचे होते. मात्र, सुरू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी या केंद्रांवर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना दिसला. जेवण मिळविण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत आहे. जेवणाचे ताट मिळावे म्हणून नागरिक चढाओढ करीत आहेत. जेवण वितरित करणारेदेखील आपल्या तोंडावर मास्क न लावताच जेवण देत आहेत, ही चिंतेची बाब आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण नाही ही समाधानाची बाब आहे. मात्र, पुढील दिवस संचारबंदीचे आणखी कडक पालन करावयाचे आहे. अशावेळी भोजन केंद्रावर होत असलेली गर्दी ही अत्यंत गंभीर बाब आहे. विशेष म्हणजे सेवा देणारे अनेक लोकप्रतिनिधी, सामाजिक सेवा संस्था असे जेवण घरपोच देत आहेत. मात्र, भांगडिया यांनी भोजन केंद्र उघडल्यामुळे एकाच ठिकाणी नागरिकांची मोठी झुंबड उडत आहे. यावर त्वरित आळा घालण्याची गरज आहे अन्यथा नागरिकांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते.