चंद्रपूर - मोहफूल वेचण्यासाठी जंगलात गेलेल्या व्यक्तीला वाघाने हल्ला करून ठार केले. नंदू मारूती बोबडे, असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना आज सकाळी निदर्शनास आली आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील परसोडी येथील नंदु मारोती बोबडे हा व्यक्ती शुक्रवारी मोहफूल वेचायला जंगलात गेला होता. मात्र, रात्रीपर्यंत तो परत आला नाही. यानंतर गावकऱ्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, त्याचा शोध लागला नाही. दरम्यान, आज सकाळी नागरिक पुन्हा जंगलात गेले असता नंदू बोबडे मृतावस्थेत आढळून आला. यावेळी नंदूला वाघाने ठार करून त्याच्या मृतदेहाचे लचके तोडल्याचे दिसून आले.
ही घटना परसोडी येथील कक्ष क्रमांक ५३३ येथे घडली. सकाळी ही घटना निदर्शनास आली तरी वनविभाग याठिकाणी वेळेवर पोहोचला नाही, याबाबत नागरिकांत कमालीचा रोष आहे. दरम्यान, उन्हाळा लागला की मोहफूल गोळा करण्यासाठी अनेक लोक जंगलात जातात. अशावेळी मानव आणि वन्यजीवामध्ये संघर्ष मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास येत आहे.