चंद्रपूर - जिल्ह्यातल्या बल्लारपूर शहर परिसरात बामणी प्रोटिन फॅक्टरीमध्ये झालेल्या अपघातात एक कामगाराचा मृत्यू झाला तर, तीन कामगार गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी ही घटना घडली.
फॅक्टरीतील रिकाम्या असलेल्या रासायनिक टाकीची सफाई करण्यासाठी विशाल माऊलीकर हे टाकीत उतरले. ही टाकी तब्बल 30 फूट खोल होती. ते खाली उतरताच काही वेळात बेशुद्ध झाले. बराचवेळ होऊन देखील माऊलीकर वर येत नसल्याने काय घडले हे पाहण्यासाठी आणखी तीन कामगार टाकीत उतरले, ते देखील बेशुद्ध झाले. मात्र घडलेला प्रकार तिथे हजर असलेल्या अन्य कामगारांच्या लक्षात आल्याने त्यांनी या तिघांना बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी नेत सतांना विशाल माऊलीकर यांचा वाटेतच मृत्यू झाला, तर अन्य तीन कामगारांची प्रकृती गंभीर आहे. बंडू निवलकर, शैलेश गावंडे आणि मनोज मडावी अशी त्यांची नावे आहेत.
बामणी प्रोटीन फॅक्टरीमध्ये एका टाकीत विशिष्ट प्रकारचे रसायन ठेवले जाते. त्यामध्ये हायड्रोक्लोरिक अॅसिडचादेखील समावेश असतो. ते मशीनद्वारे रिकामे झाल्यावर त्याची दररोज सफाई केली जाते. याचदरम्यान ही घटना घडली. मृत आणि प्रकृती गंभीर असलेल्या कामगारांना कंपनी प्रशासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांकडून होत आहे.