चंद्रपूर - तळोधी अप्पर तालुक्यातील नांदेड येथे एका विधवा महिलेची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. मृत महिलेचे नाव मंगला रमेश राऊत असे आहे. याप्रकरणी आरोपी मनोज विठोबा मेश्राम याला अटक करण्यात आली आहे. मनोज श्रमिक एल्गार संघटनेचा तालुका उपाध्यक्ष आहे.
मनोजचे मंगलासोबत काही कारणावरून भांडण झाले होते. त्यानंतर त्याने तिचा नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळा आवळून हत्या केली. आरोपी मनोजला मृत महिलेच्या सासूच्या तक्रारीवरून अटक करण्यात आली.
तळोधी (बा) पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नांदेड येथील मनोज मेश्राम याचे मृत महिले सोबत अनैतिक संबध असल्याची गावात चर्चा होती. मनोजचे नेहमी तिच्या घरी येणे-जाणे होते. दोन दिवसापासून दोघांमध्ये भांडण सुरू होते. घटनेच्या आदल्या रात्री आरोपी मृत महिलेच्या घरीच होता. सकाळी पुन्हा दोघांमध्ये भांडण झाले. या भांडणात मृताच्या मुलीलाही आरोपीने मारहाण केली व तिला जंगलात जळण आणायला पाठविल्याची माहिती मृत महिलेच्या मुलीने पोलिसांना दिली.
पैशावरुन दोघांत पुन्हा जोराचे भांडण झाले व रागाच्या भरात मनोजने नायलॉनच्या दोरीने गळा आवळून मंगलाची हत्या केली. घटनेची माहिती तळोधी पोलीस ठाण्याला मिळताच ठाणेदार रोशन शिरसाठ व पी.एस.आय आकाश साखरे घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी मिंलिद शिंदे यांनीही घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी नागभीडला पाठविण्यात आला. मृताची सासू चंद्रकला लक्ष्मण राऊत यांनी तळोधी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरून आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे करीत आहेत.
-