चंद्रपूर : मध्य प्रदेशातून आयात करण्यात आलेल्या विदेशी मद्यात आरोग्यास हानिकारक पदार्थ टाकून बनावट दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकला आहे. या कारवाईत दारूचा साठा जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. रवींद्र उर्फ बिट्टू कंजर असे आरोपीचे नाव आहे.
अवैधरित्या विदेशी दारू विक्री : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र उर्फ बिट्टू कंजर असे आरोपीचे नाव असून तो चंद्रपूर शहरातील जालनगर वॉर्डातील कंजर मोहलयात स्वत:च्या घरी मध्य प्रदेशातून अवैधरित्या विदेशी दारू आणत होता. बाटलीतील दारू काढून त्यात आरोग्यास अपायकारक असलेल्या अमली पदार्थाची भेसळ आरोपी करीत होता. भंगारातून गोळा केलेली दारूच्या बाटलीत तो रॉयल स्टॅग, डिलक्स व्हिस्की कंपनीच्या नावाने बनावट दारू भेसळ करीत होता. याची माहिती पोलिसांनी मिळाली होती.
घरी बनावट दारू तयार : त्याआधारे आरोपी रवींद्र उर्फ बिट्टू कंजर याच्या घरावर छापा टाकला असता, त्याच्या राहत्या घरी बनावट दारू तयार करण्याचे साहित्य सापडले आहे. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता त्यांना जुन्या रॉयल स्टॅग, डिलक्स व्हिस्कीच्या बाटल्यांचे तुटलेले बुचेस, नवीन बनावट झाकण, जुन्या 180 मिलीच्या रिकाम्या काचेच्या बाटल्या, ऑफिसर्स चॉईस, व्हिस्की कंपनीच्या 90 मिलीच्या रिकाम्या बाटल्या, मध्य प्रदेश सरकारचे पेपर लेबल सापडले आहे. बनावट मद्याची बाटली भरण्यासाठी वापरण्यात येणारी एक प्लास्टिकची चाळी, 10 लिटर भेसळयुक्त द्रव असलेले दोन 5 लिटरचे प्लास्टिकचे कॅन, 31 हजार 925 रुपये किमतीचे भेसळयुक्त लालसर द्रव असलेले 5 लिटरचे कॅन पोलिसांनी जप्त केले आहेत .
विविध कलमांर्तगत गुन्हा दाखल : या प्रकरणी पोलिसांनी कलम 420, 328 नुसार रामनगर पोलीस ठाण्यात आरोपी रवींद्र उर्फ बिट्टू रणधीर कंजर विरुद्ध भादंवि कलम 65 (अ) . ६५ (ब), ६५ (ड), ६५ (इ). 65 (च). ६७. महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६७ (१) (अ), ६७ (क), १०८ तसेच कॉपीराइट कायदा १९५७ चे कलम ६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.