चंद्रपूर- दारुबंदीमुळे जिल्ह्याला सामाजिक स्वास्थ्य लाभले आहे. गुन्हेगारी घटली आहे. समाज सुधारणेसाठी दारुबंदीची नितांत गरज आहे. मी कोंडय्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो या करंट्या सरकारला दारुबंदी उठविण्याची दुर्बुद्धी देऊ नको, असे मत माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले.
धाबा येथील यात्रा महोत्सवाच्या भेटीला आले असता अॅड. चटप यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सदर प्रतिक्रिया दिली. जिल्ह्यातील दारुबंदी हटविण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरू आहेत. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी अधिकारीवर्गाच्या आढावा बैठकीत दारूबंदीची समीक्षा करण्यासाठी समिती गठित करण्याचा तोंडी निर्देश दिला आहे. दुसरीकडे दारूबंदीच्या समर्थकांचा विरोध सूरू आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भवादी नेते माजी आमदार अॅड. वामनराव चटपांनी समाज सुधारणेसाठी दारुबंदी गरजेची असल्याचे म्हटले आहे. दारुबंदीच्या काळात जिल्ह्यातील गुन्हेगारी घटली. गावागावाला सामाजिक स्वास्थ्य लाभले आहे. दारुबंदी हटविण्याच्या निर्णयाला आमचा पूर्ण विरोध आहे, असे अॅड. चटप म्हणाले.