चंद्रपूर - कोरोना संदर्भात जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे आज दुबईवरून आलेल्या एका दाम्पत्याची संशयित म्हणून नोंद करण्यात आली आहे. हे रुग्ण धोक्याबाहेर असून, त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिली.
हेही वाचा - COVID19 : 'पुण्यात आणखी एक रुग्ण, कोरोनासाठी खबरदारीचा नवा प्लॅन आखणार'
राठोड म्हणाले, चंद्रपूरमध्ये दुबईवरून आलेल्या कोरोना संशयित दांपत्याची माहिती आज प्रशासनाला मिळाली. त्यानंतर या संदर्भात विशेष काळजी घेण्यात येत आहे. तसेच या दोन्ही रुग्णांना योग्य ती वैद्यकीय सेवा पुरविली जात असल्याबाबत प्रशासनाने खात्री केली. हे दोन्ही रुग्ण धोक्याबाहेर असून, त्यांना केवळ निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यशासनाने काल जाहीर केलेल्या सात देशांमधून किंवा अन्य ठिकाणावरून विमान प्रवास करून आलेल्या प्रवाशांमध्ये खोकला, ताप, श्वास घेण्यात अडथळा निर्माण होणे, अशी लक्षणे आढळल्यास तातडीने शासकीय रुग्णालयाची संपर्क साधण्याचे आवाहनही राठोड यांनी केले आहे.
स्वतः कोणतेही उपचार न करता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावा. शिंकताना खोकताना, रुमाल अथवा टिश्यू पेपरचा वापर करावा व आवश्यकता असल्यास जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उघडण्यात आलेल्या हेल्पलाईन क्रमांक 07172-261226, टोल फ्री क्रमांक 104, 020-26127394 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. राठोड यांनी केले आहे.
दाम्पत्याचे वैद्यकीय नमुने पुणे येथे पाठविण्यात आले आहे. याचा अहवाल उद्या प्राप्त होणार आहे. कोरोनामुळे जगभरात हायलर्ट घोषित करण्यात आला आहे. त्यापूर्वी काही निवडक देशातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी केली जात होती. याच दरम्यान 28 फेब्रुवारीला एक दाम्पत्य दुबईहून चंद्रपूरला आले. नागपूर विमानतळ येथून ते चंद्रपूरला परतले. यावेळी हाय अलर्ट नव्हता त्यामुळे याची महिती प्रशासनाला देण्यात आली नाही, असे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांचे म्हणणे आहे. या दरम्यान या दाम्पत्याला सर्दी, डोकेदुखी अशी लक्षणे आढळली. ते खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र आता याची माहिती त्यांनी जिल्हा आरोग्य विभागाला दिली आणि आज त्यांना विलगीकरन विभागात दाखल करण्यात आले.