चंद्रपूर - शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मात्र विकासाचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या भाजपा पदाधिकाऱ्यांचे जनतेच्या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा खुर्ची खाली करावी, असा इशारा चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी दिला आहे. चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रस्त्यातील खड्डयांच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत झोपेचे सोंग घेऊन असलेल्या मनपातील भाजपा सत्ताधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी बागला चौकात 'भजन आंदोलन' करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
बाबूपेठ, महाकाली कॉलरी, लालपेठ, जुनोना चौक, भिवापूर या परिसरातील नागरिक कामासाठी शहरात ये-जा करताना बागला चौक ते कस्तुरबा चौक या रस्त्याचा वापर करतात. मात्र या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे वाहन चालविणाऱ्या या परिसरातील नागरिकांना मणक्याचे आजार झाले आहेत. मात्र याकडे मनपातील सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. जनतेने विश्वास टाकत सत्ता दिली. मात्र सत्ताधाऱ्यांनी विश्वासघात केला. त्यामुळे शहरातील जनतेने आता भाजपाला त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहन तिवारी यांनी केले. यावेळी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मनपाच्या कारभारावर संताप व्यक्त केला. त्यानंतर रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. भजन मंडळी आणि काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भजन सादर करत निषेध नोंदविला.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय, सेवादल अध्यक्ष नंदू खनके, श्रीनिवास गोमासे, महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष सुनीता अग्रवाल, माजी महापौर संगीता अमृतकर, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, ओबीसी विभागाचे प्रदेश पदाधिकारी उमाकांत धांडे, अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्ष अनु दहेगावकर, चंदा वैरागडे, माजी नगरसेवक दुर्गेश कोडाम, नगरसेवक पिंकी दीक्षित, माजी नगरसेविका उषा धांडे, माजी नगरसेवक राजेश अडूर, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, माजी नगरसेवक राजेश रेवल्लीवार, माजी नगरसेवक बापू अन्सारी, माजी नगरसेवक प्रसन्ना शिरवार यांची उपस्थिती होती.
हेही वाचा - नारायण राणेंना अटक करताना बंद खोलीत असा घडला हायहोल्टेज ड्रामा, पाहा VIDEO