चंद्रपूर - जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस न पडल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, या महिन्याच्या अखेरीपासून जिल्ह्यात सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावली आहे. तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 30 जुलैपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात सरासरी 38 टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस जिवती तालुक्यात पडल्याची नोंद आहे.
चंद्रपूर जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 1196 मिलिमीटर एवढे आहे. मागच्या वर्षी समाधानकारक पाऊस पडला. मात्र, यावेळेस जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत सुद्धा पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे चिंता निर्माण झाली होती. ऐन वेळेस पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मागील तीन दिवसांपासून पाऊस सुरू असून पुढे सुरू राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशाराही देण्याची शक्यता निर्माण झाली आहे.