चंद्रपूर - शेतकऱ्यांना तत्काळ पीक कर्ज वाटप करण्याचे आदेश शासनाने दिले असले तरी बँका मात्र पीक कर्ज वाटपास टाळाटाळ करीत आहेत. तसेच हमीभावाने शेतमाल खरेदी करण्यात येत नाही. त्याबरोबर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, या मागणीसाठी युवा क्रांती संघटनेच्यावतीने वरोरा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी डबघाईला आला आहे. या काळात शेतकऱ्यांना विनाविलंब पीक कर्ज वाटप बाबत महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी आदेश देऊन देखील बँका विविध तांत्रिक अडचणी दाखवून पीक कर्ज वाटपास करीत आहेत. तरी शेतकऱ्यांना विनाविलंब पीक कर्ज उपलब्ध करून देण्यास आपल्या परिसरातील सर्व बँकांना आदेश द्यावेत.
तसेच बाजार समित्यांमध्ये व बाजार समित्या बाहेर व्यापारी शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने शेत माल खरेदी करीत आहेत. या बाबत बाजार समित्या व व्यापारी यांना हमी भावाने शेतमाल खरेदी करण्यासाठी आदेश देण्यात यावेत. अतिवृष्टीमुळे काढणीला आलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पीक काढले तरी अद्यापर्यंत पंचनामे झाले नाहीत.
त्यामुळे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी किसान युवा क्रांती संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. या मागण्यांचे निवेदन वरोरा तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी किसान युवा क्रांती संघटनेचे वरोरा तालका अध्यक्ष शुभम कोहपरे, तालुका उपाध्यक्ष वैभव देवतळे, तालुका उपाध्यक्ष सुरज धोटे, तालुका प्रवक्ता अनिकेत भोयर, किशोरजी चौधरी सचिव विचार विकास संस्था वरोरा तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.