चंद्रपूर - जिल्हा क्रीडा संकुलाच्या धावपट्टीचे भूमिपूजन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी क्रीडा संकुलाच्या सभोवताल माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदनाचे फलक लावले होते. याचे कौतुक जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात केले. यावर वडेट्टीवार चांगले संतापले. त्यांनी बोबडे यांना चांगलेच धारेवर धरले.
मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे क्रीडा संकुलाला 12 कोटी रुपयांचा निधी मिळाला. याचे अभिनंदन त्या फलकातून केले होते. त्याचे कौतुक जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी केले. मात्र, क्रीडा संकुलाची खरी गरज जिल्ह्याच्या ठिकाणी असताना विसापूर येथे क्रीडा संकुलावर कोट्यवधी खर्च करण्याची काय गरज होती, असा सवाल करत त्यांनी बोबडेंना धारेवर धरले.
जिल्हा क्रीडा संकुलाला 41 कोटींची आवश्यकता असताना केवळ 26 कोटींचा देण्यात आला. त्यातही 10 कोटी एवढाच निधी सध्या मिळाला आहे. उरलेले 16 कोटी अजून बाकी आहे. दहा कोटीपेक्षा 16 कोटी ही जास्त रक्कम आहे आणि ती 100 टक्के मिळणार, असे बोलत त्यांनी मुनगंटीवार यांचे नाव न घेता टोला लगावला. निधी हा कोणी कुणाच्या घरातून देत नसतो. त्याचे खरे श्रेय कुणाला जात असेल तर ते चंद्रपूरच्या जनतेला जाते, असेही ते म्हणाले.