चंद्रपूर - वडील घरी आईला व बहिणीला नेहमी त्रास देतात. याचा राग अनावर झाल्याने मुलाने वडिलांच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालत ठार केले. ही धक्कादायक घटना चंद्रपूर तालुक्यातील चोरगाव येथे घडली. याप्रकरणी आरोपी मुलाला दुर्गापूर पोलिसांनी अटक केली आहे.
श्रावण चौधरी (वय 48 वर्षे), असे मृताचे नाव असून नागेश (वय 26 वर्षे) असे आरोपी मुलाचे नाव आहे.
श्रावण चौधरी हे पत्नी, मुलगा व मुलीसह चोरगाव येथे राहत होते. त्यांची मुलगी नागपूर येथे तर मुलगा चेन्नई येथे कामानिमित्त राहतात. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे दोघेही आपल्या घरी परत आले होते. श्रावण चौधरी हे पत्नी, मुलगा व मुलीशी नेहमी भांडण करत होते. रविवारी (दि.5 जुलै) देखील ते पत्नी व मुलीसह भांडत असताना मुलगा नागेश याला राग अनावर झाला. त्याने रागाच्या भरात त्याच्या वडिलांच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातले, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी दुर्गापूर पोलिसांनी नागेश चौधरी यास अटक केली. सोमवारी (दि. 6 जुलै) त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा - चिमूर शहरात 6 जुलै ते 8 जुलैदरम्यान लॉकडाऊन; नगर परिषद प्रशासणाचा निर्णय