राजूरा ( चंद्रपूर ) - कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर केला गेला आहे. अशात कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. या परिस्थितीत घराबाहेर न पडण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे. मात्र, काही अतिउत्साही नागरिक मोठ्या प्रमाणात मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडत आहेत. अशा 50 जणांना नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि पोलिसांनी उठाबशा काढायला लावल्या.
कोरपना तालुक्यात येणाऱ्या गडचांदूर येथे सकाळी विदर्भ शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या नागरिकांना मुख्याधिकारी डॉ.विशाखा शेळकी आणि पोलिसांनी गाठले. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या या पन्नास व्यक्तींना यावेळी समज देण्यात आली. यातील 10 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर, सर्व पन्नास व्यक्तींना एका रांगेत उभे करुन उठाबशा काढायला लावल्या. नगरपरिषद आाणि पोलीस विभागाने केलेल्या या कारवाईमुळे मार्निंग वॉकसाठी बाहेर पडणारे नागरिक धास्तावले आहेत.