चिमूर (चंद्रपूर) - जादुटोणा केल्याच्या संशयातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन, ट्रॅक्टरने धडक देत एकाची हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे घडली. दयाराम रंदये (वय ६२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
शंकरपूर येथील वार्ड क्रमांक दोनमध्ये असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामागे दयाराम रंदये व रोहन माळवे यांचे एकमेकाशेजारी घर आहे. घटनेच्या, दोन दिवसापूर्वी नेहमी प्रमाणे दयाराम आपली गाय घेऊन रोहनच्या घरासमोरुन निघाले होते. त्यावेळी काही कारणामुळे ते रोहनच्या घरासमोर थांबले होते. यादरम्यान रोहनला संशय आला की दयारामने आपल्या घरापूढे गाय फिरवून जादुटोणा केला. या कारणावरुन रोहनने दयारामशी भांडण केले. यावेळी रोहनने रागाच्या भरात, तुझा ट्रॅक्टरचे धडकेने जीव घेईन, अशी धमकी दयाराम यांना दिली होती, अशी माहिती मृताच्या पत्नीने, पोलिसांना दिलेल्या तक्रारीत दिली आहे.
बुधवारी (३ जून) सायंकाळच्या सुमारास दयाराम हे प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील भीसी मार्गावर थांबले असता, रोहनने त्यांना ट्रॅक्टरने धडक दिली. या धडकेत दयाराम गंभीर जखमी झाले. तेव्हा त्यांना उपचारासाठी ब्रह्मपुरी येथे घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, याची तक्रार मृत दयाराम यांच्या पत्नीने शंकरपूर पोलीस ठाण्यात दिली आहे. यावरुन पोलिसांनी रोहन माळवले याला अटक केली आहे. त्याच्या विरोधात खून, जादूटोना विरोधी कायदा, व अॅस्ट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हाची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती शंकरपूर पोलीस चौकीचे प्रभारी उपपोलीस निरीक्षक विनोद जांभळे यांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा - ...अन् शेतकऱ्याने रोखला राष्ट्रीय महामार्ग; शेतीसबंधीत रखडलेल्या कामांसाठी उचलले पाऊल
हेही वाचा - चंद्रपूर : अवैधरित्या साठवणूक केलेले तीन लाखांचे चोरबीटी बियाणे जप्त, गोंडपिपरी पोलिसांची कारवाई