मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात प्रचाराला वेग आला असतानाच आज फेसबुकने काँग्रेसशी संबंधित असलेल्या ६६८ खात्यांवर आक्षेप घेत ही खाती बंद केले आहेत. त्यावरून काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत आहेत. आमचीच फेसबुक खाती का बंद केली जात आहेत, असा सवाल काँग्रेसने केला आहे. 'भाजप सरकारचा सत्तेचा माज आणि उन्माद जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही,' असे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
आमच्यासह भाजपची फेसबुक खाती का बंद करण्यात आली नाहीत, असाही सवालही सावंत यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी निवडणूक आयोग आणि फेसबुकच्या एकूणच कार्यपद्धतीवरही आक्षेप नोंदवले आहेत. 'यात भाजपची कोणतीही अकाउंट बंद झालेली नाहीत. फेसबुकवर सरकारचा दबाव होता हे आपण पाहतोय. निवडणूक आयोगाने हे केले असेल तर ही दुर्दैवी बाब आहे,' असे सावंत म्हणाले. 'मोदी सरकारला सत्तेचा प्रचंड उन्माद चढला असून देशातील जनता त्यांना उत्तर देईल, अशा शब्दात सावंत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
'शत्रू कितना भी प्रबल और मायावी,
नाज उसे अपने कुटीलता पर,
करोडो आशिष और सत्य की हैं साथ,
जितेंगे और काँग्रेस जरूर जितेंगे डंके की चोट पर' असे म्हणत सावंत यांनी भाजप आणि मोदींवर टीका केली.