मुंबई - भारतीय निवडणूक आयोगाने १७ व्या लोकसभा निवडणुका २०१९ जाहीर केल्या आहेत. देशभरात एकूण ७ टप्प्यांत निवडणूक होणार असून महाराष्ट्रात ४ टप्प्यांत लोकसभेचा रणसंग्राम होईल. निवडणुकीचा पहिला टप्पा ११ एप्रिलला होणार आहे. तर, अखेरचा चौथा टप्पा २९ एप्रिलला पार पडणार आहे. मतमोजणी २३ मेला होईल.
लोकसभा निवडणुकांच्या घोषणेकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले होते. आज (रविवारी) ही प्रतीक्षा संपून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. देशात एकूण ७ टप्प्यांत निवडणुका होणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी जाहीर केले. महाराष्ट्रात चार टप्प्यात निवडणूक होणार असून पहिला टप्पा ११ एप्रिल रोजी होणार आहे. मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे. तर अखेरचा टप्पा २९ एप्रिल रोजी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आजपासून देशभरात आचासंहिता लागू झाली आहे.
लोकसभेच्या एकूण ५४३ जागांपैकी महाराष्ट्रात ४८ जागा आहेत. सदस्यसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र देशातील दुसरे सर्वांत मोठे राज्य आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षासाठी महाराष्ट्र हे महत्वाचे राज्य आहे. यंदा राज्यात ८ कोटी ७३ लाख मतदार आहेत. पहिल्या टप्प्यासाठी ७ दिवसांत उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. २५ एप्रिलपर्यंत अर्ज भरता येतील. २८ एप्रिल ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. यंदा देशभरात १० लाख मतदार केंद्रे असणार आहेत. देशातील मतदारांची संख्या ९० कोटींहून अधिक आहे.
महाराष्ट्रातील मतदान कार्यक्रम
पहिला टप्पा - ७ जागांसाठी मतदान
दुसरा टप्पा - १० जागांसाठी मतदान
तिसरा टप्पा - १४ जागांसाठी मतदान
चौथा टप्पा - १७ जागांसाठी मतदान