बुलडाणा - बुलडाणा जिल्ह्यातील आळंद येथील सर्जेराव उर्फ संदीप खर्डे या जवानाला गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्यामध्ये वीरमरण आले. त्याच्या वीरमरणामुळे राष्ट्र सेवा करणाऱ्या गावातील इतर जवानांना दुःखा सोबतच प्रेरणाच मिळाली आहे. एवढेच नव्हे तर संदीपच्या वीरमरण होण्याचे दुःख सर्वांनाच आहे. मात्र, या गावांमधील राष्ट्रसेवा करणाऱ्या तरुणांची संख्या पाहिली तर या गावाला "राष्ट्रभक्तीने" भुरळ घातल्याचे वास्तव पाहायला मिळते.
जालना बुलढाणा रस्त्यावर जालना पासून सुमारे ४० किलोमीटर मुख्य रस्त्यावर आणि चार किलोमीटर पार्टी पासून डोंगराच्या कुशीमध्ये लपलेले आळंद हे सुमारे दोन हजार लोकवस्तीचे गाव आहे. गावाभोवती डोंगर असला तरी पाण्याचा मात्र येथे ठणठणाट आहे. एकूण लोक वस्ती पैकी ८० टक्के वंजारी समाज आणि 20 टक्क्यांपर्यंत मराठा व इतर समाज अशी विभागणी असलेल्या गावचे सुमारे अडीचशे उंबरठे आहेत. एवढ्या लहान गावच्या तरुणांना मात्र राष्ट्रसेवेने भुरळ घातली आहे.
मुख्य व्यवसाय शेती असल्यामुळे पारंपारिक पद्धतीने शेती करणेदेखील परवडत नाही आणि उत्पन्नही निघत नाही. ग्रामीण भागातील शिक्षण शहरी भागात नोकरी मिळविण्यासाठी कामाला येत नाही. परंतु गावातील तरुण निराश झाले नाहीत. तरुणांनी काय कमविले तर आपले शरीर कमविले. त्यातून बाहेर पडली ती "राष्ट्रभक्ती". या राष्ट्रभक्तीच्या प्रेरणेनेच गावातील शंभर तरुण हे आर्मी आणि केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये भरती झाले आहेत. तर सुमारे ७० तरुण पोलीस प्रशासन आणि राज्य राखीव दलात आहेत. यामुळे या गावाला राष्ट्रभक्तीने झपाटले आहे, असेच म्हणावे लागेल.
सुदैवाने आतापर्यंत कोणाला वीरमरण आले नाही. मात्र संदीप खर्डे हे वीरगती झाल्यामुळे गावातील अन्य तरुणांना दुःख झाले. परंतु संदीपच्या अंत्यविधीचा सोहळा याची देही याची डोळा गावकऱ्यांनी आणि तरुणांनी पाहिल्यामुळे त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग सळसळत आहे.